प्रा. डॉ. आशिष दि विखार
शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव.
मोबाईल: ९४२१८२८६६
प्रस्तावना
देशाच्या आर्थिक व आद्योगिक विकासासाठी प्रगत तंत्र उद्योग व दर्जेदार तंत्र शिक्षणाची नितांत गरज आहे. विकसनशील स्थिती व आता विकसित स्थिती कडे झेप घेताना तंत्र शिक्षणाने महत्वाची कामगिरी बजावली आहे. प्रगत तंत्र उद्योगाने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या व दर्जेदार तंत्र शिक्षणाने त्यासाठी तंत्रकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. त्यामुळे तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व आजही कायम आहे आणि भविष्यातही राहणार आहे ह्यात शंका नाही.
डिजिटल इंडियाचे वारे केंद्रीय स्तरापासून ते स्थानिक थरापर्यंत वाहत आहेत. सरकारच्या आत्म निर्भर भारत, उन्नत भारत, उन्नत महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्मार्ट इंडिया अशा प्रकारच्या उपक्रमामुळे अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहे. तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी सरकार प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना राबवित आहे, त्याअंतर्गत अभियांत्रिकी पदविका, पदवी संस्थमार्फत अकुशल व्यक्तीसाठी खास प्रशिक्षणाची सोय केली जाते आहे. वरील सर्व योजनांचा बारकाईने विचार केला तर असे लक्षात येते की, ह्या योजना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठो मोठया प्रमाणात अभियंतांची गरज भासत आहे. आणि त्यामुळे मनुष्यबळ तयार करण्यासाठी येत्या काळात तंत्र शिक्षण क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. करोना सारख्या रोगामुळे बदलत चाललेली जीवनशैली, जागतिकीकरण, तोट्यात सुरु असलेल्या सरकारी कंपन्यांचे होणारे खाजगीकारण, स्वयंचालनीकरण, अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानामुळे भविष्यात विविध क्षेत्रात अभियंता म्हणून करीअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. परंतु, अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करावयाचे असल्यास अभियंता म्हणून विविध विषयात कौशल्य प्राप्त करणे त्यासाठी आवश्यक आहे.
इंजिनिअरिंग डिप्लोमा – करिअरचा उत्तम पर्याय
इंजिनिअरिंग शिक्षण घ्यायचे म्हटल्यावर ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम त्याच बरोबरीने विविध प्रवेश परीक्षांची तयारी हे चित्र समोर येते. यामध्ये क्लासेसच्या फीचा लाखो रुपयांचा बोजा देखील पालकांवर पडतो. दहावीनंतर तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा हा शिक्षणाचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. दहावीला ३५% गुण मिळविलेले विद्यार्थी डिप्लोमाला पात्र असतात. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश देखील घेता येतो. यासाठी प्रवेश परीक्षा (सी .ई .टी ) घेतली जात नाही. डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाच्या गुणांनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. इंजिनिअरिंग पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाच्या १०% जागा (साधारण १५ हजार जागा) इंजिनिअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. या जागा मध्येच पहिल्या वर्षी रिकाम्या राहिलेल्या जागांची भर पडते. दरवर्षी या सर्व जागा जवळपास ५० हजारपेक्षा जास्त जागा पदवी इंजिनीरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी उपलब्ध होतात. डिप्लोमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध होत असते.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा ‘आय स्कीम’ नवा अभ्यासक्रम
सन २०१७ पासून पदविका शिक्षणात रोजगाराभिमुख व स्वयंरोजगार निर्मितीस चालना देणारे बनवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुबंई ह्यांनी अभ्यासक्रमात आवश्यक बदल केले आहेत़ याची फलनिष्पत्ती निश्चितपणे दिसून येईल़. गेल्या वर्षीपासून डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक कालसुसंगत बदल करण्यात आले आहेत. नवीन अभ्रासक्रमांची वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे आहेत
- नवीन अभ्यासक्रम हा आऊटकम बेस्ड शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. अभ्यासक्रम तयार करताना संबंधित इंजिनिअरिंग उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात आलेले आहेत.
- या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी प्रत्येक विषयाला मायक्रो प्रोजेक्ट, औद्योगिक प्रशिक्षण, कौशल्ये प्रात्यक्षिके, संवाद कौशल्य, मुल्यवर्धन शिक्षण, पर्यावरण, निरंतर मूल्यमापनावर आदींवर भर देण्यात आला आहे़.
- शाखेनुसार वैकल्पिक विषय दिलेले आहेत.
- प्रत्येक शाखेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य केलेले आहे.
- सदर अभ्रासक्रम एन बी ए नॉर्म नुसार तयार केलेला आहे
- सदर अभ्यासक्रमा अंतर्गत व्दितीय वर्षातील चौथे सत्र संपल्यानंतर सहा आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य झाले आहे.
- प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीज मध्ये होणारे कामकाज, तेथील मशिन्स, उत्पादन प्रक्रिया, मार्केटिंग, मशीनची देखभाल अशा बाबींचा अभ्यास करून औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.आद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आद्योगिक प्रशिक्षण रिपोर्ट तयार करणे बंधनकारक केले आहे
दहावीनंतर अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रमाची इतर वैशिष्ठ्ये
– पदविका अभ्यासक्रम हे इंडस्ट्रीच्या आवश्यकतेनुसार अद्यावत केलेले आहेत. त्यामुळे तुलनेने डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान अधिक मिळते. इंजिनिअरिंग विषयांचे मूलभूत ज्ञान उदा. इंजिनिअरिंग ड्रॉईंग डिप्लोमामध्ये चांगले मिळते त्याचा फायदा इंजिनिअरिंग पदवीच्या अभ्यासक्रमाला होतो.
– डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये ०६ आठवड्याचे ‘इंडस्ट्रिअल ट्रेनिंग’ पूर्ण करणे अनिवार्य करवण्यात आले आहे. त्यासाठी विविध उद्योगाबरोबर प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार देखील केले आहेत.
– डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध असतात तसेच सैन्य दलामध्येही नोकऱ्या उपलब्ध आहेत.
– डिप्लोमाला १२वी विज्ञान शाखा समकक्ष दर्जा असल्याने १२वी नंतरच्या विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना डिप्लोमाचे विद्यार्थी पात्र ठरतात.
– डिप्लोमानंतर चांगली नोकरी वा उच्च शिक्षण हे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याने १०वी नंतरचा इंजिनिअरिंग डिप्लोमा हा करिअरसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
– महाराष्ट्रात ७० शाखांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते. तंत्रनिकेतनामध्ये ७०% जागा त्या जिल्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर ३०% जागा अन्य जिल्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात.
– दहावीला टेक्निकल अथवा व्होकेशनल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५% जागा राखीव असतात.
– दहावीनंतर डिप्लोमा की बारावीनंतर डिग्री असा प्रश्न अनेकवेळा विद्यार्थ्यांना पडतो. परंतु बारकाईने विचार केल्यास डिप्लोमाचे शिक्षण हे पूर्णपणे प्रात्यक्षिकांवर भर देणारे असून त्यामुळे अगोदरच विद्यार्थ्यास सर्व तांत्रिक विषयांची माहिती होते.
– रोजगार व स्वयंरोजगाराच्या मुबलक संधी, कमी खर्चात पूर्ण होणारे शिक्षण, उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेपासून सुटका इ़. जमेच्या बाजू पाहता दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका हा एक उत्तम पर्याय ठरतो़.
– पदविका शिक्षणामुळे पाया अधिक भक्कम बनतो व भविष्यात आपआपल्या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून येते़.
– पॉलिटेक्निक झाल्यानंतर ज्युनिअर इंजिनिर म्हणुन प्रायव्हेट व सरकारी नोकरी मिळू शकते किंवा स्वता:चा व्यवसाय सुरू करता येतो.
– 12 वी करून इंजिनिअरींग करण्यासाठी लागणार्या खर्चाच्या तुलनेत खुपच कमी खर्च पॉलिटेक्निक करून इंजिनिअरींग करण्यासाठी लागतो. प्रवेश परीक्षा CET/JEE चा खर्च तसेंच Diploma नंतर Direct 2nd year degree ला प्रवेश मिळत असल्याने प्रथम वर्ष डिग्रीची कमीत कमी एक लाख रूपये फी वाचते.
– डिग्रीला प्रथम वर्षी आवडीची शाखा काही कारणाने मिळत नाही कारण १२वीचे व CET/JEE चे असे दोन्ही मार्क धरून डिग्री शाखेत प्रवेश दिला जातो. तर डिप्लोमा ला १०वीच्याच मार्कांनवर शाखानिवड तुमच्या मनाप्रमाणे आवडीनुसार हमखास मिळतेच.
– 12 वी करून इंजिनिअरींग करण्यासाठी (2+4) असे 6 वर्ष लागतात तवढाच वेळ पॉलिटेक्निक करून इंजिनिअरींग करण्यासाठी (3+3) असे 6 वर्ष लागतात. 6 वर्षामध्ये डिग्री व डिप्लोमा दोन्ही मिळू शकतात.
– 12 वी PCM मध्ये ग्रुप मधे 50/45 टक्कयांपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर, इंजिनिअरींगला प्रवेश मिळू शकत नाही त्यामुळे परत पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागतो, त्यामुळे 11 वी व 12 वी च्या शिक्षणाचा खर्च वाया जातो.
– पॉलिटेक्निक केल्यानंतर इंजिनिअरींग चा 70 टक्के अभ्यासक्रम पॉलिटेक्निक मध्ये अभ्यासला जातो त्यामुळे इंजिनिअरींग करणे खुपच सोपे जाते.
– सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील उद्योग धंदयातील कंपन्यासाठी पॉलिटेक्निक व इंजिनिअरींग दोन्ही कार्स केलेल्या विद्यार्थ्यांना भरती प्रवेश प्रक्रिया सोपी जाते. तसेच महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे नामांकित कंपन्यात नोकरीची 100% हमी मिळते.